श्रीक्षेत्र सिद्धटेक येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात महिन्यातील दोन्ही चतुर्थींचा उत्सव विशेषत्वाने संपन्न होतो. विशेष वार्षिक उत्सव स्वरूपात भाद्रपद महिन्यामध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ महिन्यामध्ये माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी श्रीगणेश जन्माचे उत्सव संपन्न होतात. या उत्सव काळामध्ये भगवान श्रीसिद्धिविनायकाची महापूजा झाल्यानंतर श्रींना पोशाख केला जातो. विविध पारंपारिक दागिन्यांनी श्री मूर्तीचा शृंगार केला जातो. व श्रीगणेश जन्म सोहळ्याचे कीर्तन आयोजित केले जाते.
महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांचे वंशज व सिद्धटेक येथील इनामदार, देव घराण्यातील सन्माननीय सदस्यांसह मोठ्या प्रमाणात गावकरी यावेळी उपस्थित असतात. सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान पालखी उत्सवाला सुरुवात होते. यावेळी पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी श्री चरणी समर्पित केलेली चांदीची श्रीगणेशमूर्ती पालखीमध्ये विराजित केली जाते. इनामदार श्री देव यांचा मान असल्यामुळे त्यांच्या आगमनानंतर पालखीची पूजा होऊन पालखी मार्गस्थ होते. या पालखी सोहळ्यात अब्दागिरी धरण्याचा मान हा बनकर घराण्याकडे आहे. पालखीच्या समोर आणि आजूबाजूच्या लोकांना प्रकाश मिळावा यासाठी पलिते धरण्याचा मान शेंडगे घराण्याकडे आहे. पालखीसमोर चोपदार म्हणून सेवा देण्याचा मान श्रीक्षेत्र सिद्धटेक येथील जोशी घराण्याकडे आहे. तर पालखीवर चवऱ्या ढाळण्याचा मान हा कळसकर घराण्याकडे आहे. अशा स्वरूपात गावातील समस्त मान्यवर घराण्यांना श्री उत्सवाशी जोडण्याची येथील परंपरा अत्यंत महत्वाची आहे.
विविध पदे, भजने इत्यादी म्हणत, टाळ, मृदंग व झांजा यांच्या निनादात, भगवंताच्या जयघोषासह आबालवृद्ध सानथोर मंडळींद्वारे हा पालखी उत्सव संपन्न केला जातो. गावातील विविध घरांच्या समोर, भगवान श्रीसिद्धिविनायक आपल्या घरी येत आहेत या आनंदात सडा-सारवण करून रांगोळ्या रेखाटल्या जातात. ध्वजा, पताका, तोरणे लावली जातात. प्रदक्षिणा मार्गावर असणाऱ्या सर्व मानांच्या स्थानी पालखी विश्राम करते. तेथील मंदिरातील श्री मूर्तीची पूजा संपन्न केली जाते. तेथे त्या देवतेची आरती, पदे इत्यादी गायिली जातात. त्या देवतेचा जयघोष करून पालखी पुढे मार्गस्थ होते. अत्यंत नयनमनोहर असणारा हा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी ग्रामस्थ कायमच आतुर असतात. बाहेर गावाहून देखील अनेक गणेशभक्त मुद्दाम या काळात हा पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे आवर्जून उपस्थिती लावतात. चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण पालखीचा मान श्री नलगे-पाटील यांच्या घराण्याकडे असतो. प्रदक्षिणा मार्गावरून पालखी आपली संपूर्ण मार्गक्रमण करून पुनश्च श्री मंदिरासमोर येते.
त्यानंतर पालखीपुढे टिपऱ्या, फुगड्या इ. विविध प्रकार खेळले जातात. या सगळ्यांना स्वाभाविकच अधिष्ठान असते ते श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज व त्यांच्या वंशजांनी लिहिलेल्या भगवान श्री गणेशावर आधारीत विविध भक्तिपर पदरचनांचे. अशा जल्लोषात पालखी श्रीमंदिरात परत आल्यावर विविध सौभाग्यवतींच्या द्वारे भगवंताचे औक्षण केले जाते. त्यानंतर श्रींची आरती होऊन पालखी सोहळा संपन्न होतो. पालखी नंतर इनामदार देव यांच्या हस्ते सर्व उपस्थितांना भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचा प्रसाद दिला जातो. रात्री श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या परंपरेतील पदांचे गायन केले जाते. पंचमीला महाप्रसादाचे आयोजन होते. अशा स्वरूपात या विशेष उत्सवातील पालखी सोहळा श्रीक्षेत्र सिद्धटेकचे एक वेगळे आकर्षण आहे.
माघ महिन्यातील रथयात्रेमध्ये श्रीक्षेत्र मोरगावची यात्रा संपन्न झाल्यावर श्रीमंगलमूर्ती श्रीक्षेत्र थेऊर येथे जातात. तेथे श्रीचिंतामणी- श्रीमंगलमूर्ती भेट संपन्न झाल्यावर, माघ शुद्ध नवमीला भगवान श्रीमंगलमूर्तींचे श्री क्षेत्र सिद्धटेक येथे आगमन होते.
ग्राम सीमेवरून वाजत-गाजत आणून श्रीमंगलमूर्ती श्रीसिद्धिविनायक मंदिरात स्वागत केले जाते. यावेळी नित्य उपासनेसह चिंचवडचे श्री देव महाराज यांच्या उपस्थितीत श्रीमोरया गोसावी महाराज यांनी रचलेली तथा परंपरेत असलेली विविध पदे गायिली जातात. दुसरे दिवशी भगवान श्रीसिद्धिविनायक आणि भगवान श्रीमंगलमूर्ती यांच्या संयुक्त पूजन आणि दर्शनाचा अद्वितीय लाभ उपस्थितांच्या जीवनाचे सार्थक करतो. समस्त ग्रामवासीयांना आणि त्यादिवशी आलेल्या भक्त मंडळींना श्रीक्षेत्र चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे महाप्रसाद वितरित करण्यात येतो. दुपारनंतर भगवान श्रीमंगलमूर्ती पुनश्च श्रीचिंचवड क्षेत्राकडे प्रस्थान करतात. एकाच वेळी दोन श्री विग्रहांचे परम कल्याणकारी दर्शन या वेळी घडत असल्याने असंख्य गणेशोपासक हा मुहूर्त साधण्याचा विशेषत्वाने प्रयत्न करतात.
© 2024 Chinchwad Deosthan Trust : Siddhatek. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper