भगवान श्रीविष्णु एका निर्जनस्थळी श्रीगणेश आराधनेमध्ये रत झाले व त्यांनी श्रीशंकरांनी दिलेल्या षडाक्षरी मंत्रजपाने विनायक देवतेला प्रसन्न करून घेतलें. विनायकानें श्रीविष्णूंना इच्छित वर दिल्यानंतर विष्णूंनी या टेकडीवर विनायकाचें देवालय उभे केलें आणि त्यांत गंडकी शिलेची श्री गजाननाची मूर्ति स्थापिली. विष्णूंना या टेकडीवर सिद्धि मिळाली म्हणून या क्षेत्राला ‘सिद्धक्षेत्र’ किंवा ‘सिद्धटेक’ व विनायकाला ‘सिद्धिविनायक’ अशीं नांवें पडली. विष्णूंच्या तपश्चर्येने आणि सिद्धिविनायकाच्या वास्तव्यानें पवित्र झालेली अशी ही भूमि आहे.