siddhatek-inner-banner-left-img

श्रीसिद्धिविनायक

siddhatek-home-banner-after-img
siddhatek-sidhivinayak-left-img

श्री सिद्धिविनायकाची माहिती

सिद्धटेक स्थितो भीमातीरे जगदवनकामेन हरिणा ।
विजेतु दैत्यो तच्छ्रुति मलभवौ कैटभमधू ॥
महाविघ्नार्तेन प्रखर तपसा सेवितपदो ।
गणेश सिद्धीशो गिरीवरवपुः पंचजनक ॥

श्रीगणेशाच्या आज्ञेप्रमाणे भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करण्यास प्रारंभ केला. याच वेळी भगवान ब्रह्मदेवांच्या सृष्टीच्या व्यतिरिक्त दोन वेगळेच जीव प्रकट झाले. भगवान श्रीविष्णु आराम करीत असताना त्यांच्या कानातून मळाचे दोन थेंब बाहेर आले. बाहेर आल्यावर त्या दोन थेंबांचे दोन राक्षसांत रूपांतर झालेल्या या मधू आणि कैटभ या दोन अतिशय पराक्रमी दैत्यांनीं ब्रह्मदेवाला त्याच्या सृष्टिरचनेच्या कार्यात उदंड विघ्नें आणून त्रास द्यावयास सुरुवात केली. तेव्हां ब्रह्मदेव या दैत्यांच्या नाशार्थ विष्णूंकडे गेले. विष्णू योगमायेच्या निद्रा स्वरूपाचा आनंद घेत होते. ब्रह्मदेवांनी विनंती करताच भगवान विष्णु जागृतीत आले आणि त्यांनी डोळे उघडल्याबरोबर पाहिले तर समोर दोन भयानक राक्षस आक्रमण करून येत होते. नेमके काय होत आहे याचा विचार करण्याइतका देखील वेळ नसल्याने भगवान श्रीविष्णूंनी आपली कौमोदकी नावाची गदा उचलली आणि विश्वाच्या इतिहासातील हे प्रथम युद्ध सुरू झाले.

विष्णूंनी त्या दैत्यांशी बराच काळपर्यंत युद्ध केल्यानंतरसुद्धां राक्षस हरले नाहीत, तेव्हां विष्णु साहाय्याची याचना करण्याकरितां शंकरांकडे गेले आणि आपल्या गायनकलेने त्यांनी शंकरांना संतुष्ट केले. पुढे भगवान शंकरांनी श्री विष्णूंना सांगितले की, “आकस्मिकपणे आलेल्या संकटास सामोरे जाताना तुम्ही श्रीगणेशाचे स्मरण देखील केले नाही, भगवंताचे झालेले हे विस्मरण आपल्या अयशस्वितेचे कारण ठरले आहे.” असें म्हणून विनायकाला प्रसन्न करून घेण्याचा षडाक्षरी मंत्र उपदेशिला.

या मंत्राच्या आधारे भगवान सिद्धिपतींना प्रसन्न करण्यासाठी भगवान श्रीविष्णु एका निर्जनस्थळी श्रीगणेशआराधनेत रत झाले व त्यांनी या मंत्रजपाने विनायक देवतेला प्रसन्न करून घेतलें. विनायकानें त्यांना इच्छित वर दिल्यानंतर विष्णूंनी या टेकडीवर विनायकाचे देवालय उभे केलें आणि त्यांत गंडकी शिळेची श्री गजाननाची मूर्ति स्थापिली. विष्णूंना या टेकडीवर सिद्धि प्राप्त झाली, म्हणून या क्षेत्राला ‘सिद्धक्षेत्र’ किंवा ‘सिद्धटेक’ व विनायकाला ‘श्री सिद्धिविनायक’ अशीं नांवें पडली. विष्णूंच्या तपश्चर्येने आणि सिद्धिविनायकाच्या वास्तव्यानें पवित्र झालेली अशी ही भूमि आहे.

श्री सिद्धिविनायकाची मूर्ति स्वयंभू असून ३ फूट उंच व २.५ फूट रुंद अशी आहे. तिचें मुख उत्तरेकडे असून ती गजमुख आहे. सोंड उजवीकडे झुकलेली आहे. एक मांडी घातलेली व तीवर ऋद्धिसिद्धि बसलेल्या आहेत. उजव्या सोंडेचें गणेशदैवत कडक मानतात.

siddhatek-leave-img-divider
मराठी english