अष्टविनायकांपैकी सिद्धटेक हे एक प्रसिद्ध स्थान आहे. भगवान विष्णुंच्या तपश्चर्येने व श्री सिद्धिविनायकांच्या कृपेने या स्थानावर विष्णुंना सिद्धी प्राप्त झाली म्हणून या क्षेत्राला सिद्धटेक असे म्हणतात. भगवान श्रीविष्णु, महर्षी वेदव्यास, महर्षी भृशुंडी यांच्या तपस्येने पावन झालेले हे स्थान असले तरी काळाच्या ओघात, तत्कालीन दुर्गमतेचा विचार करता हे श्रीक्षेत्र लोकांच्या नित्य संपर्कापासून दूर गेले. त्यानंतर, येथे प्रचलित दोन दंतकथांनुसार,
1) या प्रांतात फिरणाऱ्या एका गुराखी मुलाला भगवंतानी, “टेकडीवर माझे स्थान आहे, मूर्ती सध्या लपलेल्या अवस्थेत आहे.”, असा दृष्टांत दिला. त्या गुराख्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत झाडाझुडपात लपलेली मूर्ती शोधून काढली.
2) एका गुराख्याची गाय टेकडीवरील एका उंचवट्यावर जाऊन रोज दुधाची धार सोडायची, त्या जागेवर खणल्यावर गणपतीची मूर्ती सापडली असे देखील सांगितले जाते.
महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांनी आपली प्राथमिक आणि नंतरच्या काळातील तपश्चर्या या स्थानी केली.
आज पाहावयास मिळते त्या स्वरूपाचे मंदिर त्यांच्या काळातही नव्हते. सरदार फडके यांनी सर्वप्रथम भीमा नदीपासून मंदिरापर्यंतचा दगडी रस्ता बांधला. तसेच भिमा नदीवरील घाट बांधला. मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे. पंधरा फूट उंच आणि दहा फूट रुंद असे हे भक्कम गर्भगृह आपणास आजही पहावयास मिळते. मंदिरासमोरील सभामंडप बडोदा येथील थोर गणेश उपासक नवकोटनारायण स्वानंदवासी गोपाळराव मैराळ यांनी बांधलेला आहे. इथे श्री सिद्धिविनायकांच्या प्रदक्षिणा मार्गावर भगवान विष्णूंचे मंदिरही आहे.