श्रीक्षेत्र सिद्धटेक ही भगवान श्रीविष्णूंची तपस्याभूमी! भगवान श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वतः श्रीहरींनीच स्थापन केली. भगवान श्रीविष्णूंनी तपस्या काळात या क्षेत्रात निवास केला त्याचे स्मरण देण्यासाठी अद्यापि या स्थानी भगवान श्रीविष्णूंचे हे प्राचीन मंदिर विद्यमान आहे. भगवान श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या पश्चिमेला एका छोट्या टेकडीवर पूर्वाभिमुख स्वरूपात भगवान श्रीविष्णूंचे मंदिर पहावयास मिळते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे सात ते आठ उंच चबुतऱ्यावर हे मंदिर असले तरी या मंदिराला कोणत्याच बाजूने पायऱ्या नाहीत.
येथील प्रचलित दंतकथेनुसार अनेकांनी या मंदिराला पायऱ्या तयार करण्याचा प्रयत्न केला पण त्यात कुणीही यशस्वी होऊ शकले नाही. आजही आपण मंदिरात गेलात तर मंदिराच्या पश्चिम दिशेला काही दगड रचून ठेवलेले आहेत. त्याच्या आधारे फक्त पुजारी वर जातात आणि नित्य पूजा करून येतात. जणू काही भगवान विष्णूंच्या तपस्याभूमीला देखील शांततेची सवय असावी. प्रयत्न करून जर कोणी या मंदिरात मागील बाजूने पोहोचले तर तेथील अत्यंत रमणीय शांतता आपल्या मनाला आकर्षित केल्याशिवाय राहत नाही.