siddhatek-inner-banner-left-img

क्षेत्रमाहात्म्य

siddhatek-home-banner-after-img

श्रीसिद्धिविनायकांचे मंदिर व परिसर

          श्री सिद्धिविनायकाचे मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहे. मंदिरात प्रवेश करताना डाव्या बाजूला शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख आहे. श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा १५ फूट उंच व १० फूट रूंद आहे. श्रीसिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्‍या मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. सभामंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे.

          श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती टेकडीमध्ये असल्याने श्रीमूर्तीला प्रदक्षिणा करण्याची सोय नाही. प्रदक्षिणा करायची झाल्यास या संपूर्ण टेकडीलाच प्रदक्षिणा करावी लागते. श्रीक्षेत्र सिद्धटेकला प्रदक्षिणा महत्त्वाची आहे. हे अंतर १.५ किलोमीटर आहे. श्री हरिपंत फडके यांनी एकवीस दिवसात अशा एकवीस प्रदक्षिणा केल्यावर प्रसन्न झालेल्या भगवान सिद्धिविनायकांच्या कृपेने त्यांना त्यांचे सरदार पद परत मिळाले. होते. श्रीक्षेत्र सिद्धटेक येथील या प्रदक्षिणामार्गावर विविध बारा स्थाने पूजनीय स्वरूपात विद्यमान आहेत. श्रीइनामदार यांचा मानाचा वाडा, श्रीशिवाई देवीचे प्राचीन मंदिर, प्राचीन श्रीशिवमंदिर, भगवान श्रीविष्णूंचे मंदिर यासह पाठचा गणपति, महादेव मंदिर, भीमा नदी मंदिर, श्रीविष्णु पादुकास्थान, ग्रामदैवत लालहरीचे मंदिर, प्राचीन विशाल शमीवृक्ष, श्रीखंडोबामंदिर आणि पूर्वाभिमुख श्रीमारुतिमंदिर अशा या बारा मानाच्या स्थानांनी हा प्रदक्षिणामार्ग अलंकृत झालेला आहे.

         भगवान श्रीसिद्धिविनायकाची पूजा केल्यानंतर या सर्व स्थानांचे दर्शन प्रदक्षिणा केली जाते. उत्सवाचे वेळी याच प्रदक्षिणा मार्गावरून भगवंताची पालखी मिरवली जाते. अशा स्वरूपात येथील ही प्रदक्षिणा श्रीक्षेत्र सिद्धटेकचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. या मंदिराजवळून भीमा नदी वहाते. ती या ठिकाणी दक्षिणवाहिनी झाली आहे. त्यामुळे येथे भीमेचे स्नान माहात्म्य मोठे आहे. जवळच श्रीकाळभैरवाचे स्थान आहे. श्रीकाळभैरव या क्षेत्राचा राखणदार मानला जातो. चतुर्थीच्या दिवशी दिवसभर थांबलेल्या भाविकांना देवाची तीन रुपात पूजा पाहता मिळते.

siddhatek-leave-img-divider
मराठी english